आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Monday, January 23, 2012

शिवराज्याभिषेक कारण, कार्य, भाव

नमस्कार मित्रहो,

शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल थोडीशी माहिती मिळाली आहे ती इथे देत आहे, प्रामुख्याने  शिवराज्याभिषेकाचे  कारण, कार्य, भाव....


कारण -

शिवचरित्राचा अभ्यास करताना अनेक नाटयमय प्रसंग आपल्यासमोर येतात. त्यापैकी महत्त्वाचा प्रसंग म्हणजे आग्राभेट प्रत्यक्ष कळीकाळाच्या कराल दाढेतून महाराज कसे बचावले ? हे त्या जगद्नियंत्या परमेश्वरालाच ठावूक शिवरायांचा धूर्तपणा, साहस, धाडस, संकटकाळी शांतपणे विचार करून मार्ग काढण्याची प्रवृत्ती या सर्वांचाच कस या प्रसंगाने लावला व महाराज आणि नंतर युवराज संभाजीराजे महाराष्ट्रात किल्ले राजगडी सुखरूप पावले. इथे पोहोचल्या नंतरच किल्ले राजगडावर घडलेली हि कथा जी आपल्याला राजाभिषेकाचे कारण सांगते.
शिवराय व संभाजी राजे यांना राजगडी सुखरूप पाहून जिजामातासाहेब धन्य जाहल्या. त्यांच्या उरावरचे मणामणाचे ओझे क्षणार्धात नाहिसे झाले. आपल्या पुत्र व नातवाचे मृत्यूला स्पर्शून आलेले जीवन पुढे कुठलेही संकट न येता व्यतित व्हावे अशी प्रार्थना त्या माऊलीने आपल्या कुलदेवतेला केली. व त्याच आनंदात एका मेजवानीचे किल्ले राजगडावर आयोजन केले. आसमंतातल्या मातब्बर वतनदारांना, राव मराठयांना त्या मेजवानीची आमंत्रणे, निमंत्रणे गेली. व मेजवानीच्या पूर्ततेची सिध्दता सुरू झाली. डिसेंबर १६६६ हा सुमार होता.
प्रत्यक्ष मेजवानीचा दिवस उजाडला. शिवाजी महाराजांचे खाजगी चिटणीस बाळाजी आवजी चित्रे व इतर प्रधान मंडळी किल्ले राजगड पद्मावती माचीवरील दिवाण-इ-आममध्ये मेजवानीच्या बैठकीची व्यवस्था पहात होते. मुदपाकखान्यात स्वतः जिजामाता जातीेने हजर राहून पदार्थांची सिध्दता करवून घेत होत्या.
या मेजवानीत ब्राम्हण, सर्व मानकरी, पदाधिकारी, अमीर-उमराव, सरदार यांना बोलावणे होते. त्याप्रमाणे एकेकाचे येणे सुरू झाले. यासमयी कारभारी यांनी पंगतीच्या मध्यभागी चौरंग ठेवून गादी घालून थोडे उच्चासन तयार केले. त्याच्या दुतर्फा इतर मंडळीना बसण्याची चोख व्यवस्था केली. याठिकाणी आलेल्या काही सरदारांना ते उच्चासन बघून ईर्षा वाटली की “आम्ही जुने तालेवार, राजे, अधिकारी असतां हे (शिवाजी राजे) अमर्यादपणानी उंच स्थळी बसणार. आम्ही सेवकभावी दाखविणार. आम्हांस या कचेरीत बसावयाची गरज काय ?” असे बोलून उठून निघून गेले. या स्थळी महाराज पोहोचल्यावर त्यांनी इतरांसमवेत भोजन केले पण त्यांच्या कानी हि उपश्रूती गेली होती.
सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर महाराजांनी झाल्या प्रसंगाची चौकशी केली. पण त्यांना स्पष्टता कळेना. तेव्हा त्यांनी त्या प्रसंगी व्यवस्था पहाणाऱ्या आपल्या खासगी चिटणीसांना या गोष्टीबद्दल माहिती विचारली. तेव्हा बाळाजी म्हणाले, “महाराज या नावांस छत्रसिंहासन पाहिजे. त्याशिवाय राजे म्हणविणे इष्ट नव्हे. स्वयंभू पदवी असावी. जो छत्रसिंहासनाधीस राजा असतो, त्यास लोक ईश्वरसदृश मानितात.”



कार्य -

परशूरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असे सांगितले जाते. त्यामुळे जनमानसात काही गैरसमजही रूजले. काही पुराणांनी या गोष्टीला दुजराही दिला. त्याचबरोबर देवगिरीच्या पतनानंतर महाराष्ट्रात हिंदूचा राजा होणार नाही अशा विचारांचा लोकांवर पगडा होता. पण या सर्वांना शिवराजाभिषेकाने चोख उत्तर दिले.
महाराष्ट्रामध्ये क्षात्रतेजाची कमतरता नव्हती. बारा मावळात आणि सह्याद्रीच्या पश्चिम किनारपट्टीत धैर्यशील - शौर्यशील माणसे कमी नव्हती. त्यांचा वचकही कमी नव्हता. पण त्या सर्वांना एकत्र आणू शकणाऱ्यांचीच कमतरता होती. कारण मुख्य राव मराठा जातच संघटीत नव्हती. प्रत्येक राव मराठा बारा मावळांतील आपल्या कुंपणात व आपल्या अधिकारी मुलखातील मर्यादेंत राहून आपली सत्ता गाजवित होता.
शिवरायांनी राजाभिषेकाआधी अशा राव मराठा जाती साम-दाम-दंड-भेद नीतीने वठणीवर आणल्या आणि राजाभिषेकाच्या माध्यमातून त्यांच्यावर अंकुश ठेवला. ज्या प्रादेशिक सत्ता त्यांना आडव्या आल्या त्यांना त्यांनी वेळप्रसंगी कापून काढले. नामोहरम केले. परंतु त्यांचे बुध्दिनिष्ठ समाजांतील शासकीय अधिकारी पारखून आपल्या जवळ ठेवले. तसेच लष्करी अधिकारी व युध्दकुशल योद्ध्यांना कौल देऊन आपलेसे केले व या सर्व लोकांनी शिवरायांशी, स्वराज्याशी आपले इमान राखले. अशा आश्रित लोकांना राजाभिषेकामुळे चिरशास्वत स्वरूपाचा आत्मविश्वास मिळाला.
राजाभिषेकाच्या माध्यमातून शिवरायांनी अनेक गोष्टी साधलेल्या दिसून येतात. स्वराज्याशी संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या गुणांची कदर राजदरबारात केली जाते. उच्च पद देताना आपली जात, धर्म या गोष्टी पाहिल्या जात नाहीत, तर आपले धाडस, शौर्य यांचा विचार केला जातो. आपल्या वीरमरणाऱ्या पश्चात आपल्या उर्वरीत कुटुंबाची जबाबदारी राजसत्ता स्विकारील. या सर्व गोष्टींची खात्री मागची-पुढची उदाहरणे पाहून पटू लागली. शिवराजाभिषेकाचा सूमुहूर्त मृगसालाशी संलग्न धरल्यामुळे शेतकरी पेशाच्या कुणबी मराठयात आणि दूतरेजनांत आत्मियता निर्माण झाली. प्रसंगी शेतीवाडीस लागणारे साहित्य, बैल, जमीन, बी-बियाणे यासाठी राजाकडून कर्जवाम मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी झाला. बागाईतदाराला त्याच्या उत्पन्नाचा योग्य मोबदला मिळत गेला. काही वेळ बागाईतदाराचे त्याच्या उत्पन्नाचा योग्य मोबदला मिळत गेला. काही वेळ बागाईतदाराचे उत्पन्न प्रस्थापित सरकारच योग्य भावांत खरेदी करू लागले. जे कारागिर होते. त्यांच्यावर बसवलेली पट्टी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या स्वरूपात सरकारी अधिकारी स्विकारू लागले. तसेच व्यापार उदीम करणारे लोक यांनाही संरक्षण मिळाले. सह्याद्रीलगतच्या घाटाघाटातून देश आणि कोकण यामध्ये चालत असलेल्या व्यापारी मालाची वाहतूक सुखरूपपणे होऊ लागली. सर्व व्यवहार राजधानीतूनच होत असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला. बाजारपेठा सुरक्षित झाल्या याची साक्ष शिवराजाभिषेक समयी भर दरबारात सन्मानाने उभे असलेले नैगम आणि वाणी देतात. तशीच किल्ले रायगडावरील “न भूतो न भविष्यति” अशी हुजूर बाजारपेठ निर्माण झाली. बंदराबंदरातून व्यापार व वाहतूक संरक्षित व सुरक्षित होण्यासाठी राज्यसंस्थेचे आरमार गस्त घालू लागले. स्वराज्य हे प्रत्येकाला आपलेसे वाटू लागले.

भाव -

आपला राजा झाला म्हणून लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला. आपणांस योग्य न्याय मिळेल याची खात्री वाटू लागली. आपल्यावर अन्याय, अत्याचार होणार नाही. याबद्दल विश्वास वाटू लागला. आपल्या धर्माप्रमाणे चालीरीतीप्रमाणे आपण आपले जीवन व्यतीत करू शकू. हे सत्य राज्य निर्माण झाल्यामुळे लोकांना पटू लागले. प्रसंगी स्थानिक सरकारी अधिकाऱ्याकडून आपणांस न्याय नाही मिळाला तर सरळ राजदरबारात आपली वर्णी लागेल व आपणांस न्याय मिळेल हे तळागाळातील लोकांनाही पटले. शिवराजाभिषेकानंतर आणि आधी जनसामान्यातील जे लोक पदाधिकारी झाले. त्यावरून हि राजसत्ता गुणांची कदर करणारी आहे. याबद्दल लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.
भट, भिक्षू, बैरागी, गोसावी अशा कर्मकांड करणाऱ्या याचकाला झालेला राजा आपल्याच धर्माचा असल्याने त्यांच्या राज्यात आपल्या उपजीवीकेची ददात पडणार नाही असे वाटले. कवी, शाहीर आणि धार्मिक ग्रंथ निर्माण करणारे उच्चपदस्थ ब्राम्हण तसेच ज्योतिषी पूजापाठ, देवस्थळांची देखभाल करणारे अधिकारी ब्राम्हण यांना राजाश्रय मिळविण्याबद्दल आता भ्रांत राहिली नाही. असे लोक दरबारापर्यंत जाऊन आपल्या धार्मिक संस्थानातील सण-उत्सव साजरे करण्याकरिता जमिन बिदागी शिवरायांच्या हिंदूधर्माष्ठित दरबारातून सहजपणे मिळवू शकत होते. त्यामुळे राजांचे व राज्यांचे ते शुभ चिंतू लागले. दर्यावर्दी लोकांना आपल्याच धर्माची राजसत्ता असल्यामुळे स्वाभिमानाचे जिणे जगणे सहज शक्य झाले. शेतकरी वर्गाला राजांच्या कडक अनुशासनामुळे आपल्या भर पिकातून फौजफाटा जाणार नाही अगर उभे पिक कोणी कापून नेणार नाही. याबद्दल खात्री वाटू लागली. वाणी-उदीमी लोकांना आपला व्यापारी माल घाट मारून कुणी लुटणार नाही असा विश्वास शिवराजाभिषेकामुळे निर्माण झाला.

शिवरायांनी नेहमीचे हे राज्य ‘श्रीं’ चे व जनतेचे मानले. त्यात कुठेही ‘मी’ पणा आणला नाही आणि म्हणूनच प्रत्येकजण स्वराज्यात स्व-तंत्रता अनुभवू लागला. प्रत्येकाला हे राज्य आपले वाटू लागले. शिवरायांनी व्रतस्थपणे कल्याणकारी हुकूमशाही राज्यकारभारपध्दती अवलंबलेली होती.



.....सौ. शिल्पा परब - प्रधान

1 comment:

  1. प्रौढ प्रताप पुरंदर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला त्यांचा प्रताप हा या भूमीला साजेसा असून त्यांना आज शके १९३३ शुक्ल पक्ष द्वितीया/तृतीया (फाल्गुन), दि. १० मार्च २०१२............. या सुवर्णमुहूर्ता समयी मानाचा मुजरा

    ReplyDelete