आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Thursday, December 22, 2011

हरिहर गड

नमस्कार मावळ्यांनो,

आपल्यापैकी काहीजणांच्या आग्रहास्तव हरिहर गडाची मी माझ्या परीने माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे,

नाशिक जिल्ह्यापासून अवघ्या २० किमी अंतरावरील हा किल्ला..
याचे नाव हरिहर गड तसेच हर्षगड असे दोन्ही आहेत.. इ.स. १६७० मध्ये मोरोपंत इंगाल्यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात जणू सुवर्णमुहूर्त रोवली..

असा हा किल्ले हरिहर..


हा किल्ला शिवरायांकडे जवळपास १४८  वर्ष ताब्यात होता.. पुढे इंग्रजांनी १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला..

हा किल्ला सर करताना तुम्हाला खरेच शिवरायांचा गड सर करण्याचा अनुभव येयील यात दुमत नाही कारण दगडी बांधकाम, बोगदे, वेडीवाकडी वळणे....तसेच काही ठिकाणी चित्तथरारक अनुभव..
मुळात हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून हा किल्ला जवळपास समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उन्चावारती आहे.. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा गड चढताना असलेल्या पायऱ्या..
हा किल्ला मुळात निजामशहाकडे होता आणि शहाजीराजांनी हा किल्ला १६३६ मध्ये त्र्यंबकगड घेताना जिंकून घेतला..   

आपण जेव्हा हा किल्ला पाहण्यासाठी जाल तेव्हा तुमच्या लक्षात येयील कि मी पायऱ्यांचे वर्णन कशासाठी केलेले आहे, गडाच्या पायथ्यापासून तुम्हाला गडाच्या उत्तुंगपणाची  जाणीव होईल यात शंकाच नाही, एक  एक पायरी काळजीपूर्वक चढून गेल्यानंतर पुढे शेवटी नव्वद पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराशी पोहचल.. चढताना मात्र अतोनात काळजी घ्यावी कारण याचा मार्ग अत्यंत अरुंद असून एका वेळेस एकाच व्यक्तीला या पायऱ्या चढता येतील..
प्रवेशद्वाराच्या  शेजारीच दोन छोटे  बुरुज आहेत जे प्रवेशद्वाराची शोभा वाढवतात..
इथून पुढे जाताना आपणास प्रथम गणपतीचे तसेच नंतर मारुतीरायांची मूर्ती दिसतील त्याचे दर्शन घेताना शेजारीच असलेल्या शिवलिंगाचे आणि नंदीचे दर्शन हि आपसूकच होईल..
पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी आपण शेवटचा कातळटप्पा चढून पार करायची. येथे माथ्यावर पोहोचताच अगदीच छोटया सपाटीवर देवांची दाटी दिसते. या टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. उत्तरेला नजर फेकताच वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.
खाली उतरून समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी ३० फूट लांब व १२ फूट रुंद अशा या दगडी कोठीत जावे. कोठीचा   प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या  खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यास दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना मात्र आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते.

असा हा माझ्या नजरेतील किल्ले हरिहर, एकवेळ सवडीत सवड काढून अवश्य भेट द्यावा असा जाताना सोबत पाणी तसेच खाद्यपदार्थ नेण्यास नक्कीच विसरू नका आणि तुम्हास माझे आश्वासन कि तुम्ही खूपच आनंदित व्हाल एका विशिष्ट आकाराच्या गडाला भेट दिल्याबद्दल..
आणि हो  मावळ्यांनो भेट दिल्यानंतर माझ्या या समूहावर प्रतिक्रिया मात्र अवश्य द्या..
चला आता निरोप घेतो.. भेटू असेच एका नवीन शिवरायांच्या माहितीसोबत..
जय शिवराय..

No comments:

Post a Comment