आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Monday, December 19, 2011

रामसेजची झुंझ


किल्ले रामसेज ! नाशिकपासून अवघ्या १४ किमी अंतरावर हा किल्ला आहे. हिंदवी स्वराज्य गिळण्यासाठी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाने शहबुद्दीखान या नामवंत सरदाराची रामसेज च्या मोहिमेवर रवानगी केली. आणि रामसेज वेढ्यात अडकला. शहाबुद्दीखान सोबत शुभकर्ण बुंदेला - रतनसिंह हे पितापुत्र, दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते. तर रामसेजच्या किल्लेदाराची शिबंदी होती केवळ ५०० मराठ्यांची !
      संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहबुद्दीखान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो कि पळो करून सोडले. किल्ल्याला सुरुंग लावणे. मोर्चे बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानाने लाकडी धाम्धामे (बुरुज) उभे करून त्यावरून किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरु केला. पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाचे सगळे मनसुबे मराठ्यांनी उधळून लावले. किल्ल्यावरचे मराठे शरण येत नाहीत हे कळताच औरंजेबाने कासिमखानाला शहाबुद्दीन खानाच्या दिमतीला पाठवले.
      किल्ल्यावरची अल्प शिबंदी एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्याला किती काळ टक्कर देणार ? शहबुद्दीनखानाचा वेध मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले. शहाबुद्दीन खानाच्या तोफा गडाच्या बुरुजावरील दरवाजावर एकसारख्या आग ओकू लागल्या. भिंत कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले. वेढा उठवण्यासाठी रुपाजी भोसले राम्सेज्च्या पायथ्याशी येऊन मोगलांना भिडले. घनघोर युद्धाला तोंड फुटले. करणसिंह या मोगली सरदारावर त्वेषाने तुटून पडलेले रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले.
     इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला. त्याने मोर्चे लावले आणि लाकडी धमधमा (बुरुज) उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारखा गोळ्यांचा मारा करू लागला. इतक्यात वेढा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्यांनी मोगलांवर एकच हल्ला केला. किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खानची प्रचंड मोठी हानी झाली आणि गुडघे टेकून त्याने माघार घेतली.
     संतापलेल्या औरंजेबाने शहाबुद्दीन खानाला माघारी बोलवून त्याजागी बहादुरखानाची नेमणूक केली. १५,००० फौजेनिशी बहादुरखानाने रामसेजला विळखा घातला होता. मराठे आणि मोगल एकमेकांचे हल्ले चुकवून आपल्या सैनिकांना रसद पुरवत होते. शरीफखान नावाचा मोगली अधिकारी बहादुरखानाला रसद पुरवण्यासाठी निघाला होता. सात हजार मराठे एकाचवेळी त्यावर तुटून पडले आणि त्यांनी जाहीरखान फैजुल्लाखान अशा अनेक सरदारांना कापून काढले. मोगलांची जबरदस्त पिछेहाट झाली.            
मराठ्यांच्या शौर्याला कोणतीही माया लागू होत नाही हे पाहून बहादूर खानाने एक योजना आखली. एका बाजूने लढाईची तयारी चालू आहे असे दाखवायचे. किल्ल्याच्या या बाजूला दारुगोळा, तोफखाना आणि मोगल सैन्याची हालचाल दाखवून मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि दुसऱ्या बाजूने कोणतीही चाहूल लागू न देता निवडक सैन्याने गडावर चढायचे असा बेत आखला. सावध असलेल्या रामसेजच्या किल्लेदाराने बहादुरखानाचा हा डाव  अचूक ओळखला.
ज्या बाजूने मोगल किल्ल्यावर हल्ला चढवायचे भासवत होते तिथे मराठा किल्लेदाराने नगरे - नौबती कर्णे अशा रणवाद्यांचा कल्लोळ सुरु केला. किल्ल्यावरून खाली दगडांचा मारा सुरु झाला. तेलाने पेटवून माखलेले कपडे पेटवून खाली फेकण्यात येवू लागले. आणि दुसरीकडे बहादूर खानाचे सैन्य ज्या बाजूने वर चढणार त्या ठिकाणी सशस्त्र मावले दबा धरून बसले.                                        बहादूर खानाचे बेसावध मोगली सैनिक गडावर पाय ठेवतात न ठेवतात तोच ते मराठ्यांच्या तलवारीचे बळी ठरले. मोगली सैनिकांच्या किंकाळ्या आसमंतात दुमदुमल्या आणि वरून कोसळणाऱ्या सैनिकांमुळे खालून वर चढणारे हि थेट खाली आपटले. किल्लेदाराने बहादूर खानची चांगलीच फजिती केली.
बहादूर खानाचा मोतद्दार हा एक मांत्रिक होता. या मांत्रिकाने "भूतांना वश केल्याशिवाय किल्ला जिंकता येणार नाही." असा सल्ला दिला. या कामात आपण पटाईत असून १०० तोळे वजनाचा एक सोन्याचा साप बनवून दिलात तर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत सुरक्षित नेवून सैन्याला सोडू असे म्हणून त्याने खानास पटवले.
ठरलेल्या वेळी हा साप हातात घेवून मोतद्दार पुढे निघाला. अर्ध्या वाटेत आल आणि इतक्यात किल्ल्यावरून गोफणीने फेकलेला गोळा त्याच्या छातीत घुसला अन तो धाडकन कोसळला !
आत मात्र बहादूर खानाने वेढा उठवण्याची तयारी सुरु केली, बादशहाच्या हुकुमानुसार खाली मान घालून तो परत फिरला. किल्ल्यावर मोर्चे बांधण्यासाठी व चढाई करण्यासाठी त्याने प्रचंड लाकडे साठवली होती. ती सगळी लाकडे त्याने परत जाताना पेटवली. औरंग्याच्या स्वप्नाची त्या होळीत राखरांगोळी होत असताना रामसेजच्या तटावर नगरे आणि चौघडे झडत होते आणि किल्ल्यावर मराठे विजयोत्सव साजरा करत होते !
पण बादशहाची हौस अजून फिटली नव्हती म्हणूनच त्याने कासीमखान किरमाणी या सरदाराची या वेढ्यासाठी नियुक्ती केली. पण तरीही रामसेज झुकला नाही. मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचे चटके कासीम खानाला सहन झाले नाहीत. सगळे वर झेलून आणि सगळे हल्ले परतवून रामसेजच्या बालेकिल्ल्यावर भगवा जरीपटका अजूनही डौलाने फडकतच होता ! रामसेजचा तो किल्लेदार म्हणजे मूर्तिमंत शौर्याचा धगधगता आविष्कार ! त्या नररत्नाच नाव दुर्दैवाने आजही इतिहासाला माहित नाही ! त्याच्या विलक्षण धैर्याचा आणि अतुलनीय शौर्याचा मनाचा पोशाख, रत्नजडित कडे आणि रोख रकमेचा पुरस्कार देवून म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या एका प्रमुख किल्ल्यावर केली आणि रामसेज वर दुसरा किल्लेदार नेमण्यात आला.
पूर्वी मोगलाईत असलेल्या रामसेज पुन्हा जिंकायचा हि औरंगजेबाची महत्त्वकांक्षा धुळीला मिळाली. नामवंत मातब्बर सरदार, प्रचंड मोठी फौज, दारुगोळा आणि खजिना ओतूनही रामसेज सारखा एक सामान्य डोंगरी किल्ला अजूनही जिंकता येत नव्हता. किल्ल्यासाठी पुरवलेल्या दारूगोळ्याची  आणि सगळ्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश बादशाहने आपल्या अधिकाऱ्यांना दिले.
कदाचित रामसेज हा मोगलाईच्या अंतापर्यंत असाच राहिला असता. अढळ आणि अजिंक्य ! पण मुल्हेरचा किल्लेदार नेकनामखान नवीन किल्लेदाराला फितवले ! आणि दुर्दैव.. ! अनेक सरदारांना पाच वर्ष झुंजून जे साध्य झाले नाही ते लाच देऊन लगेच साध्य झाले ! केवळ फितुरीमुळे गड मोगलांना मिळाला !
एका सामान्य मैदानी किल्ल्याने मोगलांना एक न दोन तब्बल पाच वर्ष अहोरात्र झुंजवले ! एका मैदानी किल्ल्याने मोगलाची हि दयनीय अवस्था केली तर मग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेले स्वराज्यतले दुर्गम किल्ले कसे काय जिंकणार या एकाच विचाराने औरंगजेबाची झोप पार उडाली ! कधी संताप तर कधी भीतीने त्याचा उभा देह थरथरू लागला ! अस्वस्थ होवून तो एकसारखा येरझाऱ्या घालू लागला !
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मराठ्याच भगवं वादळ घोंघावत होत ! टीचभर वाटणार हिंदवी स्वराज्य आज गर्वाने छाती फुगवून ताठ मानेन उंच उभ होत आणि अवघ्या हिंदुस्थानचा शेहनशहा होण्याची इच्छा मनी बाळगणारा औरंग्या संताप आणि मनस्तापाच्या खोल गर्तेत आकंठ बुडाला होता !!
राम्सेज्ची झुंझ इतिहासाच्या सोनेरी पानात ज्यांनी सुवर्णाक्षरांनी लिहिली त्या सर्व ज्ञात-अज्ञात योध्याच्या चरणी विनम्र अभिवादन !

3 comments:

  1. नाशिकचा रामशेज किल्ला स्वराज्याच्या इतिहासात महत्वाचा साक्षीदार असल्याचा सार्थ अभिमान आम्हा नाशिककरांना ..................
    धन्यवाद ...........
    पण कदाचित किल्यावर जुल्फिखाण चालून आला होता औरंगजेबचा सरसेनापती संदर्भ "संभाजी " विश्वास पाटील यांची कादंबरी

    ReplyDelete
  2. महेंद्रजी प्रथमतः तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,

    तुम्ही सांगितलेले योग्यच आहे, पण विश्वासरावांच्या कादंबरीशिवाय बऱ्याच ठिकाणी शहाबुद्दीन आणि बहादुरखानाचाच उल्लेख आहे,

    तरीही मी आपणास लवकरच यावर खुलासा करून देईल..

    आणि हो मी जे वरती फितुरीमुळे गड गेला असे नमूद केले आहे त्याबद्दलही भिन्न मते आढळतात, पहिले मी नमूद केल्याप्रमाणे आणि दुसरे म्हणजे जेव्हा लढता लढता गडावरील रसद संपत आली आणि मावळ्यांची कमतरता झाली तेव्हा नाईलाजाने किल्लेदाराने ५०००० रुपये घेऊन किल्ला सोडला आणि शंभूराजासमोर हजर झाला पण तरीही संभाजी राजे म्हणाले "आबासाहेबांच्या शब्दाला जगलात, किल्ला त्यांच्या हुकुमाप्रमाणे झुंजवलात, भले शाब्बाश, थोर पराक्रम गाजवलात!" किल्लेदार म्हणाला "राजं पर किल्ला गेला, किल्ला राखू न्हाई शकलो म्या". संभाजी राजे हसले, म्हणाले, "आता नविन कामगिरी देणार आहोत आम्ही तुम्हाला, बोला करणार ना?" किल्लेदार छाती फुगवून म्हणाला, "राजं बोट दाखवा, काय हव तुमास्नी, राजं काळजावरं बोट दाखवलंत तरी ते काढून द्याया माग न्हाई बघणार, हुकूम करा राजं!" राजे म्हणाले, "औरंगजेब रामसेज तटा-बुरूजांनी सजवतोय, त्याला सजवू द्या, आणि एकदा का तो सजला, की घाला झडप आणि जिंकून घ्या परत! करणार ना?" किल्लेदार फक्त बोलला "राजं...." आणि मुजरा घालून सदरेवरून निघाला!

    ReplyDelete